Saturday, February 5, 2011

मोरेश्वर | मोरगाव Moreshwar | Morgaon अष्टविनायक दर्शन माहिती

ह्या देवळाच्या सभोवताली त्याच्या संरक्षणार्थ पक्का तट बांधण्यात आलेला आहे. जमिनीपासूण ह्या तटाची उंची जवळजवळ पन्नास फूट असावी. चार दिशेला चारी कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे असलेले आढळतात.
मोरगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, हे गाणप्य सांप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. ह्या पुण्यक्षेत्राबद्दल गणेशपुराणात बरीच महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. ह्या क्षेत्राचे प्राचीन नाव, ‘भूस्वानंदभुवन’. ह्या गावात मोरांबी वस्ती अगदी भरपूर आहे. म्हणूनच ह्या गावाला मोरगाव असे नाव पडले असावे. आणि मोरम्हणजे मयूर, म्हणून इथला देव मयुरेश्वर.
ह्या मंदिराचे तोंड उत्तरेकडे आहे. मंदिर उंचवट्यावर असल्यामुळे मंदिरात शिरण्यापूर्वी पायऱ्या चढाव्या लागतात. प्राकाराबाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना आहे. आणि नगारखान्याच्या खालच्या बाजूला, आपल्या पुढल्या दोनपायांत लाडू धरलेला उंदीर उभा आहे. त्याच्यापुढे पंधरा फूट उंचीवर दगडी चौथऱ्यावर नंदी बसलेला आहे. त्या दगडी चौथऱ्यापुढे दहा-बारा फूट अंतरावर मुख्य मंदिर आहे. त्याचा प्राकार दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. ह्या चौथऱ्यावर सभामंडप आहे आणि सभामंडपला लागून, पूर्वेकडे देवाचे शेजघर आहे. सभामंडपाचे पूर्वेला आवारामध्ये एक शमीचे आणि एक बिल्वदलाचे झाड आहे. पश्चिम दिशेला कल्पवृक्ष आहे. दर्शनाला आलेले भक्तजन याच वृक्षाला बसून अनुष्ठान करीत असतात.
मोरया गोसावी यांनी सुद्धा याच वृक्षाखाली तपश्चर्या केली.
तटाच्या आतल्या बाजूला चौकाच्या आठ कोपऱ्यांवर श्रीगणेशाच्या आठ प्रतिमा बसविलेल्या आहेत. तेवीस परिवार मूर्ती नवीन करून घेतलेल्या आहेत. आणि त्या मंदिरात सर्वत्र बसविलेल्या आहेत.
सभामंडपानंतर मुख्य गाभारा लागतो. गाभाऱ्यातील श्री मोरेश्वराची मूर्ती अत्यंत रमणीय आशी आहे. मूर्तीच्या डोळ्यांत आणि बेंबीमध्ये हिरे बसविलेले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर नागाची फणा आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सिद्धी बुद्धीच्या मूर्ती उभ्या आहेत. त्या पितळेच्या आहेत. मोरेश्वराची मूर्ती भव्य आणि रेखीव अशी आहे.
असे म्हणतात की ही मूर्ती मूळची नव्हे. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनलेलि असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे.
मूळ मूर्तीची स्थापना स्वतःअ ब्रह्मदेवानेच केली होती. पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली. आणि हल्लीची मूती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली.
मोरया गोसावी यांचा जन्म याच क्षेत्रात झाला. एक दिवस, ब्रह्मकमंडलू-तीर्थात स्नान करीत असताना त्यांना गणेशाची मूर्ती सापडली ह्या क्षेत्रामध्येच त्यांनी उग्र तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त करून घेतली. श्रीरावेशाच्या आज्ञेवरूनच आपल्याला कुंडात सापडलेली मूर्ती चिंचवड येथे नेली. आणि तेथे त्या मूर्तीची स्थापना केली. आणि चिंचवडला येऊन राहिले होते. तरीसुद्धा प्रत्येक शुद्ध चतुर्थीला ते मोरगावची वारी करायला कधीही चुकत नसत. शेवटी पवनाकाठी त्यांनी जिवंत समाधी घेतली.
ह्या मोरेश्वराविषयी, पुराणात काही माहिती दिलेली आहे.
कोणे एकेकाळी चक्रपाणी ह्या नावाचा एक राजा मिथिल देशात भंडकी नगरीत होऊन गेला. त्याला सिंधू नावाचा पुत्र झाला. त्या सिंधूने उग्र तपश्चर्या केली आणि सूर्यनारायणाकडून अमरपदाची प्राप्ती करून घ्तली. त्यामुळे तो उन्मत्त झाला. आणि त्याने सर्व देवांना जिंकले आणि त्यांना छळ आरंभला. सर्व देव एकत्र झाले आणि श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूने त्या सिंधूशी युद्ध सुरू केले. परंतु त्या युद्धात विष्णूचा पराभव झाला. आणि त्यामुळे देवांचा छळ तसाच चालू राहिला. सर्व देव आता श्रीगजाननाला शरण गेले. श्रीगजाननाची त्यांनी प्रार्थना केली. श्रीगजाननाने पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. आणि मोरावर बसून त्याने सिंधूशी युद्ध केले. युद्धात सिंधूचा वध केला. तेव्हापासून मोरगावच्या गजाननाचे नाव मयुरेश्वर आथवा मोरेश्वर असे पडले.
ज्याची इच्छा धरावी, ती गोष्ट हा मोरया देतो अशी याची ख्याती आहे.
मोरया मोरया मी बाळ तान्हे ।
तुझीच सेवा करु काय जाण ।
अन्याय माझे कोट्यानुकोटी ।
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ॥
कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू ।
तिथे नांदतो मोरया जाण पाहू ।
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे ।
मनी इच्छिले मोरया देत आहे ॥


No comments:

Post a Comment