Saturday, February 5, 2011

गिरिजत्मज | लेण्याद्री Vighneshwar | Ozar अष्टविनायक दर्शन माहिती


लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. ह्या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गावापासून हा डोंगर मैल-दीड मैल अंतरावर आहे.
पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहात असते. त्यावेळी डोंगरावरील श्रीगणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्राय ठरते.
डोंगरावरील लेणी फारच सुंदर आहेत. ह्या देवालयाच्या सभामंडपाची उंची फार कमी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप बराच मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. मुख्य गाभारा बराचसा आतल्या बाजूला आहे आणि तेथे बराच अंधार आहे.
ह्याच डोंगरातील एका गुहेमध्ये पार्वतीने तपश्चर्या केली. श्री विनायक तेथे प्रगट झाले तेव्हा तिने तिथे श्री विनायकाची प्रतिष्ठपना केली. परंतु ती जागा अतिशय अवघड अशा जागी आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्या गणपतीचे दर्शन घेण्याचे काम महाकर्म कठीण ठरते.
असे सांगतात की, इतिहासकाळात एकदा नाना फडणविसांनी त्या बिकट जागेवर असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना दृष्टांत झाला आणि त्यामुळे तो आपला प्रयत्न त्यांना सोडून द्यावा लागला.
देवालयात गणपतीची स्वतंत्र अशी मूर्ती नाही. परंतु लेण्यातील एका भिंतीवर गणपतीचे बालरूप खोदून ठेवलेले आढळते.
लेण्याद्रि गणपती तो हाच !
ह्या गणपतीसंबंधीची पुराणातली कथा अशी -
देवी पार्वती एकदा लेण्याद्रीच्या गुहेत बसलेली असताना गणपती आपला पुत्र व्हावा असे तिला वाटले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने मातीची गणेशमूर्ती तयार केली आणि त्या मातीच्या मूर्तीचे ती चिंतन करू लागली. मग काय ?
मातीची मूर्ती सजीव झाली.
दिव्य तेजस्वी असा तो गणपती तिच्या पुढे आला. परंतु पार्वती आपल्या चिंतनात मग्न झाली होती. त्याने तिला जागे केले. पार्वती धन्य झाली.
गणपतीने तेथेच वास्तव्य केले.
अनेक लीला करून दाखविल्य.
अनेक राक्षसांना गणपतीने नायनाट केला.
पार्वती म्हणजेच गिरिजा.
त्या गिरिजेचा हा आत्मज म्हणून गिरिजात्मज
लेण्याद्रिच्या कडेकपारी । गिरिजात्मज तो वास करी ।
मातेसाठी मिरीकुहरी । पार्थिव देवत्व पावले ॥

No comments:

Post a Comment