ह्या देवस्थानाविषयी कथा
प्राचीन काळी विदर्भामध्ये कौंडिण्य नावाचे एक शहर होते. तेथे भीष्म नावाचा एक पराक्रमी आणि दानशूर असा राजा राज्य करीत होता. राजा असला तरी तो सुखी नव्हता कारण संततीचे सुख त्याला लाभले नव्हते. त्यामुळे आपल्या गादीला वारस नसणार आणि आपला वंशविस्तार होणार नाही याची त्याला चिंता लागून राहिली होती.
एके दिवशी त्याच विचारामुळे त्याचे डोके भणाणून गेले आणि राज्यकारभार आपल्या प्रधानावर सोपवून तो आपल्या राणीसह अरण्यात निघून गेला. अरण्यात गेल्यावर एकदा त्याची आणि विश्वमित्र ऋषींची गाठभेट झाली. आणि त्यांनी राजाला राज्य सोडून देण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने आपणास पुत्रसौख्य नसल्यामुळे आपण हा अरण्यावास पत्करला असे सांगितले. विश्वमित्रांनी राजाला एकाक्षर मंत्राचा जप करण्यचा उपदेश केला.
राजा अरण्यातून माघारी फिरला. राजधानीत परत आल्यावर त्याने दक्षाने बांधलेल्या मंदिरात एकाक्षरी मंत्राचा जप करायला सुरवात केली. उग्र तपश्चर्येमुळे सारे विश्व त्याराजाला श्रीगणेशमय दिसू लागले. श्रीगणेश प्रसन्न झाले, राजाने पुत्रप्राप्तीचा वर मागितला. श्रीगणेशानी ‘तथास्तु’ म्हटले.
यथाकाल भीष्म राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव रुक्मांगदासे ठेवण्याट आले. तो तेजापुंज होता आणि त्याची कांती सोन्यासारखी होती. राजकुमाराला योग्य असे सर्व प्रकारचे शिक्षण त्याला दिले. आणि भिष्माने आपला राज्यकारभार त्याच्यावर सोपवून त्याला एकाक्षरी मंत्राचा उअप करण्याचा उपदेश केला.
राजकुमार रुक्मांगद एकदा शिकारीच्या निमित्ताने अरण्यात गेला. आपल्या नेमबाजीने त्याने बऱ्याच जनांवरांची शिकार केली. जनावरांचा पाठलाग करीत राहिल्यामुळेतो बराचसा थकला. त्याला विश्रांतीची जरुरी होती. म्हणूनच विश्रांतीसाठी जवळच असलेल्या एका ऋषिंच्या आश्रमात तो गेला. मुनी स्नानाला जाण्याच्या गडबडीत होते. त्यांना रुक्मांगदाने नमस्कार केला. त्याला आश्रमात बसावयास सांगून ऋषी आपल्या स्नानाला निघून गेले.
मुनीची पत्नी मुकुंदा ही अतिशय रूपवती अशी होती. तिचे रूपसौंदर्य अनुपम होते. रुक्मांगदाला दमल्यामुळे फार तहान लागली होती. त्याचा घसा कोरडा पडला होता. मुकुंदराजवळ त्याने पाणी मागितले. याचकाला तिने पाणी दिले. परंतु ती रुक्मांगदावर मोहित झाली.
तिला काही सुचेनासे झाले आणि रुक्मांगदाला बोलण्यात गुंतवून, तिने आपली वासना तृप्त करण्याची त्याला विनंती केली. परंतु रुक्मांगद तसे दुराचरण करायला तयार झाला नाही. त्याने तिला साफ साफ नकार दिला. तो वश झाला नाही म्हणून ती बरीच कामविव्हल झाली आणि तिने रुक्मांगदाला शाप दिला की, “तुला कुष्ट रोग होईल.
रुक्मांगद त्या आश्रमातून बाहेर पडताच, त्याच्या सोन्यासारख्या अंगावर कुष्ट रोगाचे पांढरे पट्टे दिसू लागले. त्याला फार दुःख झाले. लोकांना आपण आपले तोंड तरी कसे दाखवावे. याची त्याला लाज वाटू लागली. तो आपल्या राजधानीकडे गेलाच नाही. अरण्यातील एका वटवृक्षाखाली आसन ठोकून तो एकाक्षरी मंत्राचा जप करू लागला. त्या निराश बनलेल्या राजकुमारापुढे नारदमुनी प्रगट झाले. आणि त्याला म्हणाले, “कदंब नगरामध्ये गणपतीचे एक देवालय आहे. चिंतामणी ह्या नावाने तो देव आणि कदंबतीर्थ ह्या नावाने ते तीर्थ प्रसिद्ध आहे. देवालयासमोर एक सरोवर आहे. तेथे जाऊन त्या सरोवरात जर का तू स्नान केलेस तर तुझा कुष्ट रोग साफ बरा होईल. तेव्हा ताबडतोब तेथे जा आणि त्या सरोवरात स्नान कर.
रुक्मांगदाने उपदेश प्रमाण मानला आणि कुष्ठरोगापासून तो मुक्त झाला.
इकडे कामविव्हल झालेली मुकुंदा जवळच एका शिळेवर लवंडली. आणि रुक्मांगदाचे ध्यन करू लागली. ती बेसावध बसली होती. तिचे पती वाचक्नबी मुनी आश्रमात नव्हते. देवांचा राजा इंद्र याच्या ध्यानात ही गोष्ट आली. त्याने रुक्मांगदाचे रूप घेतले आणि मुकुंदाची कामेच्छा पूर्ण केली. ती गरोदर राहिली. आणि त्या संबंधापासून तिला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद.
ऋग्वेदातील मंत्रद्रष्टा असा मुनी तो हाच गृत्समद. अनीति मार्गातून त्याचा जन्म झाला म्हणून याज्ञिक मंडळी नेहमीच त्याचा धिक्कार करीत राहिली. त्याच्या जन्माची ती अजब कहाणी आत्रेय मुनींना अंतर्ज्ञानाने अगदी संपूर्ण माहीत झाली होती.
वांरवार, गृत्समदाच्या वाट्याला अवमान-अपमान येत राहिले.जेव्हा तेव्हा त्याची अवहेलना होऊ लागली. अशाच एका प्रसंगी, तो रागाने अगदी लालबुंद झाला. संतापाने पाय आपटीत तो आपल्या मातेकडे गेला आणि त्याने आपला पिता कोण म्हणून विचारले. ती म्हणाली- “रुक्मांगद”, आपल्या आईचा त्याला अतिशय राग आला आणि त्यान शाप दिला.
“तू अमाप फळे येणारी कंटकी होशील, पण तुझ्या फळांना एकही प्राणी कधी तोंड लावणार नाही.” त्याची आई मुकुंदा ही सुद्धा चिडली आणि तिने त्याला शाप दिला- “तुझ्या पोटी एक राक्षस जन्म घेईल आणि तिन्हीलोकांना तो त्रस्त करील.” इतक्यात आकाशवाणी झाली - “गृत्समद हा इंद्राचा पुत्र आहे.” मुकुंदा बोरीचे झाड झाली. मृत्समद घोर तपश्चर्या करण्यासाठी महडच्या अरण्यात आला.
“गणनां त्यां गणपती” ह्या मंत्राचा त्याने जप केला. श्रीगजानन त्याच्यावर प्रसन्न झाले आणि तो मंत्रद्रष्टा बनला.
महडच्या श्रीवरदविनायकाची मूर्ती, त्या गृत्समदाने स्थापन केली. आणि त्यानेच हे देवालय बांधले अशी समजूत आहे.
देवालय पूर्वाभिमूख आहे. लांबून ते एखाद्या कौलारू घराप्रमाणे दिसते. परंतु आत शिरल्यावर आपल्याला कळून येते की ते कोरलेल्या दगडाचे आहे. कोरीव काम मोठे प्रेक्षणीय आहे. मूर्तीसंबंधी दुसरी एक समजूत अशी आहे की, १६९० साली ही मूर्ती एका गणेशभक्ताला तीथल्या तळ्यात सापडली. त्या भक्तान मूर्तीची स्थापना एका अखंड दगडाच्या कोनाड्यात केली. हल्लीचे देवालय हे १७२५ साली बांधण्यात आले. १८९२ सालापासून ह्या देवालयातील नंदादीप अखंडपणे तेवत आहे. मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. सिंहासनाभोवती दगडी महिरप आहे. दोनहत्तीआणि मध्य देवी आहे. सिंहासनाहून मूर्ती वेगळी आहे. मूर्ती पाषाणाची असून डाव्या सोडेंची आहे. मंदिराच्या घुमटाला सोनेरी रंगाचा कळस आहे. देवाच्या गाभाऱ्यापुढे आठ फुटाचा सौरस सभामंडप आहे. बाहेरचा सभामंडप चाळीस फूट लांब आणि चाळीस फूट रुंद अस ऐसपैस आहे. चौफेर गॅलरीवजा माडीही आहे.
देवस्थानाच्या खर्चासाठी नगदी इनाम आहे. १६९० साली शाहू महराजांनी पहिली सनद दिली. १७३० साली दुसरी सनद देण्यात आली. आणि तिसरी सनद ब्रिटीश अमदानीत देण्यात आली ती १८९४ साली.
महडगावी वरदमूर्ती । करी कामनांची पूर्ति ।गृत्समदे केली कीर्ती । गणनांत्वा गणपतीम् ॥
No comments:
Post a Comment